भोसरी : जत्रा म्हटलं की, खाद्यपदार्थांची लज्जत आणि स्वाद आलाचं.. . महाराष्ट्रासह परराज्यातील प्रमुख खाद्यपदार्थांची मेजवानी यंदा 'इंद्रायणी थडी' जत्रेत चाखायला मिळणार आहे. तब्बल ३०० हून अधिक विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल जत्रेकरिता 'बूक' झाले आहेत. विशेष म्हणजे, शितपेय, मिल्क पार्लर, आईस्क्रिम सेंटर यासह स्नॅक्स आणि मिठाईचेही भरगच्च स्टॉल जत्रेत लावण्यात येणार आहेत. त्यामुळे भोसरीतील जत्रेत महाराष्ट्रभरातील खवय्यांची चांगलीच हौस होणार आहे. पिंपरी-चिंचवडचे भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानावर महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा 'इंद्रायणी थडी' भरविण्यात येणार आहे. दि. ३०, ३१ जानेवारी आणि १, २ फेब्रुवारी २०२० असे चार दिवस, सकाळी १० ते सायंकाळी १० या वेळेत ही जत्रा नागरिकांसाठी खुली राहणार आहे. ___ जत्रेत महाराष्ट्रीय पुरणपोळीसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आदी भागांतील प्रमुख खाद्यपदार्थांची चव चाखायला मिळणार आहे. वास्तविक, पिंपरी-चिंचवड शहरात देशभरातील विविध प्रांतातून नागरिक रहायला आले आहेत. महाराष्ट्रातील 'मिनी इंडिया' अशी या कामगारनगरीची ओळख आहे. याठिकाणी डालबाटी, छोले बटोरे, अप्पम, हैद्राबादी बिर्याणी, दही बल्ले, राजमा रोटी अशा विविध पदार्थांचा स्वाद घेता येणार आहे, अशी माहिती शिवांजली सखी मंचच्या प्रमुख पुजा महेश लांडगे यांनी दिली. जत्रेचे समन्वयक संजय पटनी म्हणाले की, सुमारे १२ एकर परिसरात ८०० पेक्षा जास्त स्टॉल जत्रेत उभारण्यात आले आहेत. त्यापैकी ४७३ स्टॉल विविध खाद्यपदार्थ आणि पेय प्रकारांसाठी निश्चित केले आहेत. या जत्रेत नागरिकांना व्हेज बिर्याणी, व्हेज थाळी, चिकण लॉलीपॉप, चायनिज भेळ, मटर पनीर रोटी, मोमोज, पुरणपोळी, समोसा, दाबेली, विविध तंदूरचे प्रकार, उत्तप्पा, ठेचा भाकरी, लापसी आदी पदार्थांचा स्वाद घेता येणार आहे.
इंद्रायणी थडी महाराष्ट्रात भारी, चाखायला या गावरान पिठलं अन भाकरी!